जळगाव : प्रतिनिधी
कालच्या आणि आजच्या पत्रकारितेत फार मोठी दरी निर्माण झाली आहे त्यामुळे आचारसंहितेची लाचारसंहिता होऊ लागली आहे.अशावेळी दिशाहिन सत्ताधाऱ्यांना भानावर आणण्याचे काम पत्रकारांनी जागृतपणे करावे असे आवाहन अमळनेर येथील पत्रकार संदीप घोरपडे यांनी केले तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासन आणि पत्रकारिता या विषयावर प्रबोधन करतांना,पत्रकारांनी सत्याची चाड धरुन पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व ज्येष्ठ पत्रकार श्री.घोरपडे यांनी पत्रकारितेतील होणारे बदल व निर्भिड पत्रकारितेची गरज स्पष्ट केली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजूमामा भोळे यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देतांना,विकासात्मक पत्रकारितेवर भर देण्याचे आवाहन केले.अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील हे होते.
प्रारंभी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा झाली.यंदा पत्रकार संघाचा हिरक महोत्सव मोठ्या उत्साहात व विविध उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यादृष्टीने एका समितीची स्थापना करण्यात आली.यावेळी आद्य पत्रकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली.
आपल्या प्रबोधनात संदीप घोरपडे यांनी माजी आमदार गुलाबबापू पाटील यांच्या आठवणींना उजाळा देतांना,त्यांच्यात दडलेल्या पत्रकार उभा करतांना त्यांनी मातीशी जपलेलं नातं स्पष्ट केले.शब्दाशब्दावर विश्वास असा एक काळ होता मात्र अलिकडच्या काळात त्या विश्वासाला तडा गेला आहे.वरुन खाली येणाऱ्या पाळण्याच्या गतीने पत्रकारितेची विश्वासार्हताही घसरत आहे.ती विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी पत्रकारांनी उचलली पाहिजे,असे आवाहनही त्यांनी केले.समाजात अंधश्रध्दा व अपप्रवृती पसरविणाऱ्या प्रवृत्तीविरुध्द प्रखर लेखणी चालवण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासन व पत्रकारिता यांनी विधायकदृष्टी ठेवून काम केले तर जिल्ह्यातील अनेक समाजहितोपयोगी प्रकल्प मार्गी लागू शकतात असा आत्मविश्वास व्यक्त करतांना जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.प्रारंभीच्या जीवनात ६-७ वर्षे केलेल्या पत्रकारितेची आठवण विषद करुन ते म्हणाले की, पत्रकार म्हणून काम करणे ही तारेवरची कसरत आहे.सत्य जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे.जनमताचा कल लक्षात घेऊन पत्रकारिता केली पाहिजे.सोशल मीडियाला पत्रकारिता म्हणता येणार नाही,असे स्पष्ट मत व्यक्त करुन,जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करतांना त्यांनी हिरक महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य कमलाकर वाणी यांनी पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडल्या जात असून त्या सोडविण्यास लवकरच यश येईल असे स्पष्ट केले.
याप्रसंगी समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यात श्रीमती रोझमीन खिमाणी,संदीप महाजन(पाचोरा),संजय निकुंभ,डॉ.बाळासाहेब कुमावत,सुरेश सानप,प्रवीण सपकाळे,बी.एस.चौधरी,शब्बीर सय्यद आदींचा समावेश होता.
व्यासपिठावर पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया यांच्यासह अजित नांदेडकर,देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी,प्रमोद पाटील,भिकाभाऊ चौधरी,सचिन सोमवंशी,लेखराज उपाध्याय,देवीदास वाणी आदी होते.दिलीप शिरुडे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार भवन समितीचे सचिव सारंग भाटिया यांच्यासह अशोक भाटिया,प्रमोद पाटील,विवेक खडसे,लेखराज उपाध्याय,पांडुरंग महाले,अजित नांदेडकर आदींनी परिश्रम घेतले.
मी कुठेही उभा राहिलो तरी…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत असतानाच आ.राजूमामा भोळे यांचे सभागृहात आगमन झाले.त्यांचे स्वागत करतांना पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्यासपिठाजवळ येण्याचा आग्रह केला त्यावेळी ते थोडे व्यासपिठाकडे सरकले मात्र समीप आले नाही.कॅमेऱ्यात ते यावेत यासाठीची धडपड पाहून ते म्हणाले, काळजी करु नका,मी कुठेही उभा राहिलो तरी कॅमेरा माझ्यावरच असतो.त्यावर सभागृहात हास्याचा फवारा उडाला.
