मुंबई : प्रतिनिधी
राम मंदीरासाठी आम्ही आमचे योगदान दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंदीरात जाऊन आलो आहे. अयोध्येत मी कधीही जाईल. कधीही दर्शन घेईन. याचे राजकारण होऊ नये, असे ठाकरे म्हणाले. बाबरी मशीद पडली तेव्हा भाजपचेच नेते होते, शिवसेनेचे कोणी नव्हते असे विधान फडणवीसांनी केले होते. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तेच (फडणवीस) चढले असतील आणि त्यांच्या वजनाने मशीद पडली असेल तर माहिती नाही, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
बाबरी पडल्यानंतर सीबीआयचे स्पेशल कोर्ट झाले. आरोपी म्हणून नावे प्रसिद्ध झाली त्यात स्थानिक शिवसैनिक, अनेक खासदार आणि १०९ पदाधिकारी आहेत. मी स्वत: ३ वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलोय. जे दावा करतायत, त्यांनी हे पाहायला हवे, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.
ते शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलतात, त्यावरुन त्यांची मानसिकता कळते. त्यांचा गृहपाठ कमी पडत असेल. तुम्हीच स्वत: ढोंगी बुरखा फाडत असल्याचे ते म्हणाले. मीच सगळ केलं अशा कोणी फुशारकी मारु नये. आडवाणींनी ही रथयात्रा काढली नसती तर हे शक्य नव्हते. हा अस्मितेचा लढा होता जो पूर्ण झाला, असे ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते फडणवीस?
बाबरी मशीद पाडली होती तेव्हा तिथे भाजपसोडून कोणीच नव्हते.हे केवळ वाचाळवीर आहेत. कुठल्या संघटनेने क्रेडीट घ्यायचे नाही,कारसेवकांनी मशीद पाडली सांगायचे,असे आम्हाला सांगण्यात आले होते.आम्ही शिस्त पाळणारे होतो. म्हणून आम्ही कारसेवकांचे नाव सांगितले.
दरम्यान कोणीतरी बाळासाहेबांना प्रश्न विचारला, तुमच्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली का? तेव्हा त्यांनी माझ्या शिवसैनिकांने बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे विधान केल्याची आठवण फडणवीसांनी करुन दिलीबाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो,लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते, असे फडणवीसांनी सांगितले.