मुंबई : प्रतिनिधी
तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही काळापासून समोर येत आहेत. हे अत्यंत भीषण आहे, लहान वयात हृदयविकाराचा धक्का येणं ही एक चिंतेची बाब झाली आहे. असंच काहीसं नाताळच्या सकाळी ३२ वर्षीय जेना गुडसोबत घडले. रात्री ३ वाजता जेनाचा नवरा रस याला अचानक जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की शेजारी असलेली जेना श्वास घेत नाहीये. आपल्या तीन आठवड्यांच्या बाळाच्या शेजारी पत्नीला मृतावस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला.
रस यांनी तात्काळ पत्नीला सीपीआर देण्यास सुरुवात केली तसेच लाऊडस्पीकरवर ९९९ वर कॉल केला. कॉल केल्याच्या काही मिनिटांतच सहा पॅरामेडिक्सची टीम तीन रुग्णवाहिकांमध्ये त्यांच्या घरी आली. जेना अजूनही श्वास घेत नव्हती. त्यामुळे रस घाबरलेला होता. पण, त्याने सीपीआर दिल्याने जेनाचा जीव वाचला असल्याचे डॉक्टरांनी रसला सांगितले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला आहे.
हे ऐकताच रसच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला की, मला खूप आनंद झाला आणि तेवढंच आश्चर्यही वाटले. जेनाला रुग्णवाहिकेत नेण्याआधी, जेनाच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यासाठी पॅरामेडिक्सना दोनदा डिफिब्रिलेटर वापरावे लागले होते.जेना या इंग्लंडच्या सरे येथील स्टेन्सच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात.जेनाला अनेक वर्षांपासून अनियमित हृदयाच्या ठोक्याची समस्या होती, परंतु डॉक्टरांनी तिला कोणताही धोका असल्याचे सांगितले नव्हते.