वरणगाव : प्रतिनिधी
वरणगाव पाणी पुरवठा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकार आता उघडकीस येत आहेत. मोजमाप पुस्तिका ( एमबी) आधी ७५ लाखांची नोंद केली, त्यात खाडाखोड करुन नंतर ४० लाखांची नोंद केली. या पुस्तिकेत फेरबदल करण्याचा अधिकारी नसतांना पदाचा गैरवापर करुन ‘एसी’ नावाच्या ठेकेदाराची मोजमाप पुस्तिका असतांना ४० लाखांचा धनादेश वरणगाव नगरपालिकेने ‘अरिहंत’ला काम न करता दिला आहे. या गैरप्रकाराला जीवन प्राधिकरणाचे निकम व वरणगाव नगरपालिकेचे शेख हे जबाबदार असून मोठा आर्थिक घोळ समोर आला आहे. बोगस बॅक गॅरंटी नंतर मोजमाप पुस्तिकेचा देखील घोळ पुढे आला आहे. त्यानंतरही कुठलीच कारवाई न करता जीवन प्राधिकरण व वरणगाव नगरपरिषद शासनाचे हित न पाहता ठेकेदाराच्या दिमतीला लागले आहे.
वरणगाव शहराची पाणी पुरवठयाची महत्वाकांशी योजनेचे अधिकाऱ्याच्या अर्थकारणामुळे तीनतेरा वाजले आहेत. २५ कोटीची ही पाणी पुरवठा योजना दोन वर्षात पूर्ण होणे गरजेचे असतांना चार वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे या योजनेचे काम करणाऱ्या अरिहंतने बोगस बॅँक ग्ॉरंटी सादर केली असतांना शेख व निकम हे अधिकारी लाभासाठी त्यांना पाठिशी घालत आहे. एमबी बदलविण्याचा अधिकार नसतांना ७५ लाखांची नोंद असतांना मध्येच ४० लाख रुपयांची खिरापत अरिहंतला धनादेशव्दारे देण्या मागचे गोडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकऱ्यांकडे केली असून जो पर्यंत मोजमाप पुस्तिका व बॅँक गॅरंटी हे दोन विषयांची निपक्षपातीपणे चौकशी होत नाही तोपर्यंत संबधित ठेकेदाराला कुठलेही बिल अदा करु नये तसेच शासनाची यात फसवणुक होत असून संबधित जबाबदार निकम व शेख यांच्यावर जबाबदारी निश्चीत करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.