नाशिक : प्रतिनिधी
अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश नसल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलेले नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
राममंदिराच्या उभारणीत किंवा कारसेवा अशा दोन्ही गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळेच सरकारने त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नसावे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण न देण्याच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राम मंदिर आंदोलनाचे आपण स्वत: साक्षीदार आहोत.दोनवेळा आपण कारसेवेत सहभागी झालो.20 दिवस कारागृहात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत आले नाहीत. संपूर्ण जगाला माहिती आहे की, त्यांचा राममंदिर आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही. ते आमदार आहेत म्हणून त्यांना सरकारने निमंत्रण देणे गरजेचे आहे, असे नव्हे. राम मंदिर उभारणीत उद्धव ठाकरे यांचे योगदान काय, असा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शाह यांनी राममंदिराचे दर्शन मोफत करु, अशी घोषणा केली होती. रामलल्ला भाजपची मालमत्ता आहे का? रामलल्ला हा सर्व हिंदू समाजाचा आहे. त्यांच्यावर कोणत्याही एका राजकीय पक्षाचा हक्क नाही. भाजपचे हिंदुत्त्व म्हणजे केवळ देखावा आहे. शिवसेनेला हिंदुत्त्वाचा गर्व आहे आणि तो कायम राहील. आमचं हिंदुत्त्व दुसऱ्या धर्माचे द्व्ेष करणारे नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी
केली होती.