पुणे : वृत्तसंस्था
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ओपिनियन पोलवर मत मांडले आहे. ते म्हणाले की, सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे-खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला. त्यामुळे सर्व्हेेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असेही शरद पवार यांनी येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना स्पष्ट केले. …इंडिया…च्या दिल्ली येथील बैठकीत मी स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे, असे सांगितल्याचेही शरद पवार म्हणाले.त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मविआची शक्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपासह महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहील असे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रामुख्याने श्रीराम मंदिराचा मुद्दा प्रचारात आणण्याची योजना आखली असून त्यादृष्टीने वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.नुकत्याच दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत देशातील जागा वाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे ठरले त्यात महाराष्ट्रातील ४८ जागांबाबतही जवळजवळ निर्णय झाल्याची चर्चा आहे.शिवसेना(ठाकरे गट),राष्ट्रवादी (शरद पवार गट)आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत मतैक्य झाल्याचे वृत्त आहे.तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला व राजू शेट्टींच्या शेतकरी स्वाभिमानी संघटनेला प्रत्येकी एक जागा सोडण्याचेही जवळजवळ ठरले आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला, त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातले नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलंं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे.त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.