अजितदादा म्हणाले, लोकसभेत पाडणार खा.अमोल कोल्हे यांनीही शड्डू ठोकला

0
50

पुणे : प्रतिनिधी
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी राजीनामा देतो म्हणून सांगत होते मात्र निवडणूक जवळ आली की पदयात्रा सुचतेय, अशा निशाणा साधताना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला.निवडणूक जवळ आली की कुणाला संघर्षयात्रा तर कुणाला पदयात्रा सुचतेय. लोकशाहीत प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे पण ५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं, अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हेंवर टीका केली. अजित पवार यांच्या याच टीकेला आणि पराभूत करण्याच्या चॅलेंजला खासदार कोल्हे यांनीही उत्तर देत ‘है तय्यार हम’ म्हणत शड्डू ठोकला.
“दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देणं, एवढा मी मोठा नेता नाहीये. मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण मला जर शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर १०० टक्के मी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढणार. शरद पवार यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. पण निवडणूक एक माध्यम आहे आणि सत्ता हे एक साधन आहे. जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मुल्ये या गोष्टीच्या बाजूने राहायचं, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिले. तसेच दादांच्या बंडखोरीला डिवचून प्रचारात कोणते मुद्दे असतील, याचे संकेतच दिले.

अजितदादांनी टीका न
करता पाठिंबा द्यावा
शेतकऱ्यांसाठी पदयात्रा काढणं यात चूक काय आहे? कारण दादांना पण माहितीये कांद्याच्या निर्णातबंदीमुळे शेतकऱ्यांना किती मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्याच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शिवनेरीवरून पदयात्रेला सुरूवात करतोय. मला वाटतं आमच्या पदयात्रेला अजितदादांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे, ते आता सरकारमध्ये आहेत तर त्यांनी केंद्राला सांगून कांद्यावरची निर्यातबंदी उठविण्यासाठी जरूर प्रयत्न करायला पाहिजे, असा टोमणा अमोल कोल्हेंनी दादांना मारला.

होय मी निवडणूक लढणार!
शिरूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम पवारसाहेबांनी केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली मी शिरूरचं प्रतिनिधित्व करतोय. निवडणूक म्हटलं की आव्हान प्रतिआव्हानच द्यायला पाहिजे असे नाही. निवडणूक म्हणजे पुढची ५ वर्षे या भागाचं प्रतिनिधित्व कोण करणार, इथले प्रश्न संसदेत कोण मांडणार, असे याकडे बघितले गेले पाहिजे. दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देणे, एवढा मी मोठा नेता नाहीये. मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण मला जर शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर १०० टक्के मी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढणार, असेही ते म्हणाले.
५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं, या अजित पवार यांच्या टीकेवर अमोक कोल्हे म्हणाले, “आधी कान धरला असता तर नक्कीच मी सुधारणा केली असती, त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता पण हरकत नाही, आत्ता जरी कान धरला असेल तरी मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here