मुंबई : प्रतिनिधी
एलियन्सबद्दल दररोज नवनवीन दावे समोर येत असतात. असे म्हटले जाते की, एलियन्स हे यूएफोने वारंवार पृथ्वीवर येत असतात. ब्रिटनमध्ये अडीच वर्षांत सुमारे १००० यूएफओ दिसले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यापूर्वी, एका तज्ज्ञाने सांगितले होते की, एलियन्सचा शोध लागू नये म्हणून ते आपल्या सूर्यमालेच्या अगदी बाहेर गडद अंधाऱ्या ठिकाणी लपलेले असू शकतात पण,आता नासाच्या एका माजी संशोधकाने अनोखा दावा केला आहे.
यूएफओचे पायलट हे महासागराखाली असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. २००१ ते २००५ या कालावधीत नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम केलेले केविन नूथ यांच्या मते, अशी कारणे आहेत ज्यावरुन असे दिसून येते की, एलियन्स पृथ्वीच्या पृष्ठभागावर न राहता पाण्याखाली राहून आपल्यावर लक्ष ठेवत असतील.
जर त्यांना लपून राहायचे असेल तर समुद्राचा तळ त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम जागा असेल. तेथे त्यांनी त्यांचा तळ बांधला असावा आणि तिथे ते वास्तव्य करत असतील. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि प्रत्यक्षात आपण त्या संपूर्ण भागात पोहोचू शकलेलो नाही. त्यामुळे, एलियन्सना लपण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे,असे त्यांनी थिअरी ऑफ एव्हरीथिंग पॉडकास्टला
सांगितले.
यूएफओच्या अलीकडील अनेक दृश्यांमध्ये विमानांचा समावेश आहे, जे हवेत आणि समुद्राच्या आत सहजपणे फिरताना दिसतात. जर एलियन्स हे जलचर वातावरणातून आलेले असतील तर त्यांच्यासाठी ते अधिक सोयीस्कर असेल, असेही केविन यांनी सांगितले.