नांदेड : वृत्तसंस्था
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेडमध्ये सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात म्हणाले.
येत्या काही दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे. भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे सूचक वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही. भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे.