धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर
शेतातील कूपनलिकेसाठी मोटारीच्या वीजजोडणीकरीता तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता. चोपडा) येथील वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
अनिल राठोड (२८, लक्ष्मीनगर, धानोरा, चोपडा) असे या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. जळगाव येथील ५० वर्षाच्या तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने देवगाव (ता. चोपडा) शिवारात शेत आहे. या शेतात थ्री फेजच्या कूपनलिका मोटारीसाठी तक्रारदारांनी वीजजोडणी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल राठोड यांना भेटले. त्यांनी या कामासाठी चार हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपये ठरले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पथकाने शुक्रवारी दुपारी सापळा रचत तक्रारदारांकडून वरिष्ठ तंत्रज्ञ राठोड यास तीन हजारांची लाच स्वीकारताच अटक केली. याप्रकरणी अडावद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.