जळगाव : प्रतिनिधी
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जळगावात विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली.नंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही या कार्यालयाची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली.
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा28 जूनरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
या घोषणेला 6 महिने उलटले. तरीही निर्णय होत नसल्याने संजय सावकारे यांनी विधीमंडळात या कार्यालयाची पुन्हा मागणी केली. उर्वरित महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगरला न्याय दिला जातो. मात्र खान्देशवर अन्याय होतो म्हणून खान्देशसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्त कार्यालय जळगावात स्थापन करावे, अशी मागणी केली. तेव्हा धुळ्यातील एका आमदाराने जळगावला नको म्हणत धुळ्यात कार्यालय स्थापन करा, अशी मागणी केली.
यावर उत्तर द्यायला उभे राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी कार्यालय कुठे करायचे यावर एकमत करा म्हणून सल्ला दिला. तेव्हा मागे बसलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावलाच करा म्हणून पुस्ती जोडली. फडणवीस मात्र विनोदी सूर छेडत गेले हा विषय माझ्या अखत्यारित नाही, असे सुचवत गेले. नंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास हा विषय आणून देऊ. निर्णय होत नाही तोपर्यंत तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द देत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
