मुंबई : प्रतिनिधी
भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याचे वडिल रमेश तेंडुलकर यांचा आज वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याचे वडील रमेश यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोसह सचिनने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता, जे कवी आणि कादंबरीकार होते. सचिन कायमच त्याच्या यशाचे श्रेय वडिलांना देत असे.
सचिन तेंडुलकरने वाढदिवसाची ही पोस्ट शेअर करत लिहिले, “माझे वडील खूपच काळजी घेणारे होते, परंतु कधीही कठोर नव्हते. त्यांनी मला आयुष्यात जे करायचे आहे ते निवडू दिले आणि माझी स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मला पाठिंबा दिला. मला वाटते की, त्यांनी आपल्या सर्व मुलांना ज्या प्रकारे मोठे केले – नेहमीच आम्हाला प्रेम आणि स्वातंत्र्य दिले, हा पालकत्वाचा एक मोठा धडा आहे. त्यांची विचारसरणी त्यांच्या काळाच्या पुढे होती आणि मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.या लाखो कारणांपैकी हे एक आहे. मी जो काही आहे तो फक्त त्यांच्यामुळे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, मला तुमची रोज आठवण येते.
रमेश तेंडुलकर यांचे १९ मे १९९९ रोजी निधन झाले आणि १९९९ च्या विश्वचषकादरम्यान सचिन भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये होता. यादरम्यान सचिन तेंडुलकर भारतात परतला आणि त्याने चार दिवस कुटुंबासोबत घालवले मात्र, नंतर तो इंग्लंडला परतला आणि त्याने केनियाविरुद्ध महत्त्वपूर्ण शतक झळकावून भारताला पुढच्या फेरीत नेले. त्याने नंतर त्याच्या आत्मचरित्रात कबूल केले की, त्या वेळी त्याला खेळावेसे वाटत नसले तरी त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने तेथे असावे.
वनडेत सर्वाधिक धावा
करण्याचा विक्रम
सचिन तेंडुलकरच्या वनडे पदार्पणाला आज ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ डिसेंबर १९८९ रोजी तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना पाकिस्तानशी होता, तेव्हा भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले. या कालावधीत त्याने ४४.८३ च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि ८६.२३ च्या स्ट्राईक रेटने १८४२६ धावा केल्या. तो वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकेही केली आहेत.
