जालना : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा आंतरवाली सराटी गावात आज(रविवारी) ठरवली जाणार होती मात्र, याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचेदेखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे ही आपली मागणी असून सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. १९६७ पूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आधी आरक्षण द्यायला हवे होते. ओबीसी आरक्षण त्यानंतर देण्यात आले. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देवसुद्धा रोखू शकत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीतून दिला आहे.
आता माघार नाही
दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेनंतर दिवस वाढवून देणार नाही.आता माघार घेणार नाही. कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतली आहे.जे ठरलंय त्यानुसार २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे लागेल. मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे. त्यामुळे मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करा.नोंदी सापडल्याने ओबीसीतून आरक्षण देण्यास कुणीही रोखू शकत नाही.ओबीसींच्या लेकरांचे आम्ही काढून घेत नाही. मराठा आणि ओबीसी समाज आधीपासूनच एकच आहे.धनगर आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे धक्का लागत नाहीत, त्यामुळे इतर समाजाला धक्का लागण्याचे कारण नाही, असे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता गुलालच अंगावर घ्यायचा
मनोज जरांगे म्हणाले की, आता गुलालच अंगावर घ्यायचा, आता माघार नाही. आपली भूमिका मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करा अशी आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर आपल्याला निकष पार करावे लागत होते. मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे. आढमूठ कोण आहे,मराठे आहेत की आपल्यात मराठे येऊ नयेत म्हणणारे आहेत?, असे जरांगे
म्हणाले.
ओबीसमधूनच आरक्षण घ्यायचे
आतापर्यंत ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या असल्याचे मंत्री गिरीश महाजनांकडून सांगण्यात आल्याचे जरांगे म्हणाले. आरक्षणात येण्यासाठी मराठा समाजाला कोणी रोखू शकत नाही. ओबीसी आरक्षणात सर्वात अगोदर मराठा समाज आहे. ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी शासकीय नोंदी आवश्यक आहे. आपल्यामुळे एससी आणि एसटीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तसेच, ओबीसीमधील एनटी, व्हीजेएनटी, धनगर आणि वंजारी बांधवांना धक्का लागत नाही. कारण त्यांचा ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग आहे.त्यामुळे आता ओबीसमधूनच आरक्षण घ्यायचे असल्याचे जरांगे म्हणाले.
