जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ६ सदस्यांची नावे निश्चीत करुन त्यांना शासनाकडून मान्यता मिळवून घेतली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
१४ पैकी ६ सदस्य राष्ट्रवादीचे झाल्याने विशेष निमंत्रित म्हणून भाजप आणि शिंदे गटाला आता फक्त प्रत्येकी ४ जागा मिळणार आहेत.तसेच अन्य ४ तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीवरही अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी असतात. तर १४ विशेष निमंत्रित तर ४ तज्ज्ञ सदस्य या समितीवर असतात. १४ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने घेतल्या आहेत. या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत आणि सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत राहणार आहेत. नियोजन विभागाने मान्यता दिलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये माजी आमदार दिलीप वाघ, सावद्याचे राजेश वानखेडे, साकेगावचे रवींद्र पाटील, एरंडोलचे डॉ.सुरेश पाटील, जळगावचे योगेश देसले व चोपडा येथील घनश्याम अग्रवाल यांचा समावेश आहे.