भारताकडून चीनचा विक्रम मोडीत नव्या विश्वविक्रमाला गवसणी!

0
25

पुणे : प्रतिनिधी

आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवा अशी सूचना देण्यात आल्यानंतर घड्याळ सुरू झाले अन्‌‍‍ जवळपास पाच मिनिटे मैदानावर शांततेत वाचन सुरू झाले. सर्व तपासणी पूर्ण करून तीन हजार ७७ पालकांनी सलग चार मिनिटे गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदवला गेल्याचे जाहीर करण्यात आले. या उपक्रमातून भारताने चीनचा विक्रम मोडीत काढला.
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगणे’ हा उपक्रम झाला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
उपक्रमात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या गोष्टीचे सलग तीन मिनिटे वाचन केले. ‘गिनेस बुक’च्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून विश्वविक्रम नोंदवल्याचे जाहीर करताच वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंद साजरा करण्यात आला. चीनमध्ये आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगून विश्व विक्रम नोंदवला होता. आता नवा विक्रम पुण्यात नोंदवला गेला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांच्या दोनशे दालनांच्या प्रदर्शनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here