नागपूर : वृत्तसंस्था
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी नागपुरात आंदोलन करत आहेत. १९८२ मध्ये शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली होतीय मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. ही पेन्शन योजना सर्वात शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा नागपूर येथे सुरु असून तो हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.
त्याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. महाराष्ट्रात कोणताच वर्ग सरकारवर खुश नाही असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
“दीड महिन्यापूर्वी मला आपले नेते भेटले आहेत. अडीच वर्षे आपले सरकार होते तेव्हा पाच दिवसांचा आठवड्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जुनी पेंशन योजना लागू करता येते की नाही, याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. गद्दारांनी गद्दारी करुन आपलं सरकार पाडलं. जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता. सरकार म्हणून आमचे चेहरे असतात. कागदावरच्या घोषणा जमिनीवर आणण्याचे काम तुम्ही करत असता. अशा महत्त्वाच्या घटकाला स्वतःच्या मागणीसाठी आक्रोश करावा लागत असेल आणि सरकार त्यावर कानाडोळा करत असेल. तर त्यांना टेंशन देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कोणताच वर्ग सरकारवर खुश नाही. हे अवैधपद्धतीने आणलेले सरकार आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.