परळी : वृत्तसंस्था
बीड म्हटले की मुंडे कुटुंब आणि दोन भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण आता पंकजा मुंडेंशी असलेला राजकीय संघर्ष संपला असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बीडमधील नागरिकांसाठी हा मुद्दा राजकीय चर्चेचा ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही भावंडांमध्ये असणारा राजकीय वर्चस्वाचा वाद आता संपल्याचं खुद्द धनंजय मुंडेंनीच जाहीर केल्यामुळे आता दोघेही आगामी काळात एकत्र महायुतीचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे.
बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजि पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण त्यांच्यासमवेतच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भगिनी, तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे याही एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं.