जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध उपनगरांतील तसेच कॉलन्यांतील अंतर्गत रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाळा असल्याने पादचार्यांसह नागरिक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावकर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिकेसह महापौर, उपमहापौरांकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे किमान शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याला तरी प्राधान्य देऊन त्वरित नागरिकांना दिलासा द्यावा, यासंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी सतत महापालिका आयुक्तांसह अधिकार्यांसमवेत बैठका घेतल्या व पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील किमान मुख्य रस्त्यांवरील त्यात डांबरी व काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा विषय गंभीरतेने घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेस आठवडाभरापासून सुरूवात केली. यात सातत्याने मक्तेदारांकडून केल्या जाणार्या कामांसंदर्भातील नागरिकांची ओरड लक्षात घेऊन संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने स्वतःचीच संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरविली आहे.
महापालिका प्रशासनातर्फे आठवडाभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम शाखा अभियंता श्री.चंद्रशेखर सोनगिरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामध्ये काही दिवसांत नेहरू पुतळा परिसर ते रेल्वे स्थानक, तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले. शनिवार, दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे अभियंता श्री.योगेश वाणी यांच्याकडील जबाबदारीतून बुजविण्यात आले. त्यात हे सर्व खड्डे अनुक्रमे 6, 12 व 14 एम.एम.ची खडी तसेच इमल्शन डांबर एकत्रित करून रोडरोलरच्या सहाय्याने दबाई करून बुजविले जात आहेत. तसेच या कामांची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्याकडून नियमित पाहणी केली जात आहे. सुरूवातीला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संपल्यानंतर पावसाळा संपताच इतर रस्त्यांच्या कामांनाही सुरूवात होईल. त्यासाठीही महापालिका प्रशासन व शासन दरबारी आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी कळविले आहे.