मुंबई : प्रतिनिधी
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत १४ ते १५ जागा लढवणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दावामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा शरद पवार गटाला तर त्यानंतर उर्वरित वाटा काँग्रेसला मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या १४ ते १५ जागा लढवणार आहे. यात बारामती, अमरावती, भंडारा, सातारा,शिरूर,रायगड, रावेर,दिंडोरी आदी मतदार संघांंचा समावेश आहे, असे जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेस दाखवणार मोठेपणा
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.त्यात शिवसेनेच्या ठाकरे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. याऊलट काँग्रेस या प्रकरणी सर्वात कमी जागा घेऊन आपला मोठेपणा दाखवून देईल अशी चर्चा आहे.