कर्जत (अहमदनगर): वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास चार महिने उलटले. सध्या निवडणूक आयोगासमोर पक्ष व पक्षचिन्ह कुणाचं? यासंदर्भात सुनावणीही चालू आहे मात्र, यादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केले आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.
पवारांच्या राजीनाम्यावेळी
नेमकं काय घडलं?
‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजीनामा मागे घेण्यासंदर्भात छगन भुजबळांपासून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विनंती केली. यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. यासंदर्भात अजित पवारांनी शिबिरात बोलताना सविस्तर भाष्य केले.
“आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले.प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला तिथे बोलवून घेतले. तिला काहीच सांगितलं नाही की आम्ही सगळे तिथे आहोत. तिला सांगितले की, सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते. सगळं ऐकल्यानंतर तिनं सांगितलं की, मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते.आम्ही १० दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते”, असा दावा अजित पवारांनी आपल्या भाषणात केला.
१ मे रोजीच राजीनामा
द्यायचं ठरलं होतं”
दरम्यान, पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच राजीनामा देण्याचा निर्णय झाला होता, असे अजित पवार म्हणाले. “१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.
आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले की, उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजे. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की, राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का, राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणं बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा. एक घाव दोन तुकडे, विषय संपला”, असेही अजित पवार म्हणाले.