मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काल हा निर्णय जाहीर केला. फक्त राहुल द्रविडच नाही तर त्यांच्यासोबतचा अन्य सपोर्ट स्टाफ विक्रम राठोड, टी दिलीप आणि पारस म्हांबरे यांचा देखील कालावधी वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची निवड होण्याची शक्यता आता मावळली आहे.
नुकत्याच झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सलग १० विजयांसह अंतिमफेरी गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला होता पण कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक अजीत आगरकर यांनी बीसीसीआयकडे राहुल द्रविड आणि अन्य स्टाफला आणखी एक कार्यकाळ देण्याची शिफारस केली होती.
ही शिफारस स्विकारण्यात आल्यामुळे प्रशिक्षकपदी व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची होणारी संभाव्य निवड आता मागे पडली आहे.