जळगाव येथून पुणे, हैदराबाद गोवासाठी उडानचा प्रस्ताव

0
16

जळगाव : प्रतिनिधी

उडान ५.० प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सने जळगाव विमानतळाला पुणे, हैदराबाद आणि गोवा या शहरांबरोबर जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेब्रुवारी २०२४ पासून जळगावातून २१ उड्डाणे प्रस्तावित आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ‘फ्लाय ९१’ एअरलाईन्स कंपनीच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी फ्लाय ९१ एअरलाईन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनीजळगाव विमानतळ सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. बैठकीपूर्वी फ्लाय ९१ कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्याशी विमानसेवेबाबत चर्चा केली होती.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील १२ ठिकाणांचा विकास आराखडा वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागांद्वारे तयार केला जात आहे. जामनेर येथे नवीन टेक्सटाईल पार्क प्रस्तावित आहे. धुळ्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला आहे. जळगाव बायपासचे काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे अमळनेर येथील श्री.मंगळग्रह देव मंदिरात भाविक एका तासात पोहोचू शकणार आहेत.
विमानतळावरून टॅक्सी सेवा देणाऱ्या उद्योजकांना या विमानतळामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. विमानतळ सेवेमुळे जळगाव पुण्याला जोडले जाणार आहे. विमानतळ सेवा विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत करेल आणि लहान व्यवसायांना चालना देईल. जळगाव किंवा भुसावळ येथून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये बुकिंग मिळत नाही. वाजवी दरात चांगल्या दर्जाची एअर कनेक्टिव्हिटीमुळे रेल्वे आणि बसेसवरील ताण कमी होईल,
श्री.प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात विमानतळाच्या माध्यमातून ‘कार्गो हब’ सेवा ही विकसित होऊ शकते. जळगाव येथे औद्योगिक क्षेत्रासह रेल्वे, धावपट्टी आणि महामार्ग एकमेकांपासून ५ किलोमीटर अंतरावर आहेत. विमानतळाभोवती १८ मीटर रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्यामुळे परिसरातील जमीन मालकांना गोदामे आणि कारखाने विकसित करण्याची संधी निर्माण होईल. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने सादर केलेला प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या विचाराधीन आहे. केळीसारख्या नाशवंत वस्तू आणि सोन्याचे दागिने यासारख्या उच्च मूल्याच्या वस्तू जळगावमधून पुणे, गोवा आणि हैदराबाद मार्गे निर्यात केल्या जाऊ शकतात. याचा फायदा केवळ जिल्ह्यालाच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील खान्देश आणि जवळच्या भागातील जिल्ह्यांना होईल. अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here