मुंबई : प्रतिनिधी
जवळपास दोन तास झालेल्या ड्राम्यानंतर हार्दिक पांड्याची अधिकृतपणे मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता आयपीएलची रिटेंशन विंडो बंद करण्यात आली. त्यावेळी गुजरात टायटन्सने त्यांचा कर्णधार हार्दिकच्या नावाचा समावेश रिटेंशन लिस्टमध्ये केला होता. गुजरात हार्दिकला मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे हार्दिकचे नाव रिटेंशन लिस्टमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने ‘ऑल कॅश ट्रेड’चा आधार घेतला. त्यामुळे हार्दिकची मुंबई इंडियन्समधील घरवापसी निश्चित झाली. गुजरात टायटन्ससोबत औपचारिक स्वरुपात व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला पण औपचारिक कागदोपत्री व्यवहार अद्याप तरी पूर्ण झालेली नव्हती पण आयपीएल आणि बीसीसीआयने मंजुरी न दिल्याने हार्दिकचे नाव रिटेंशन लिस्टमध्ये दिसले.
हार्दिक पांड्याचा ट्रेड ऑफ संध्याकाळी ५ नंतर पूर्ण झाल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि आयपीएल संंचालन परिषदेच्या सदस्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.हा व्यवहार आता अधिकृत झाला असून हार्दिक आता मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात
मुंबई इंडियन्सने त्यांच्या ताफ्यातील अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला ऑल कॅश व्यवहारात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत ट्रेड केलं. त्यानंतर त्यांच्याकडे गुजरात टायटन्ससोबत संपूर्ण व्यवहार रोखीत करण्यासाठी आणि हार्दिकला आपल्याकडे घेण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध झाली. गेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने ग्रीनला १७.५ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. त्यामुळे जोपर्यंत ग्रीनला एखादा संघ ट्रेड करत नाही, तोपर्यंत मुंबईकडे पांड्याला खरेदी करण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती.