गर्भवती बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावतीमधील घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

0
20

अमरावती : वृत्तसंस्था
मुंबईत महिलेवर बलात्कारानंतर अमानुष अत्याचार केल्यानंतर झालेल्या मृत्यूमुळे संताप व्यक्त होत असतानाच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. सर्वसाधारण कुटुंबातील या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. १७ वर्षीय पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या प्रकारात सदर मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब तिच्या पालकांना समजली नव्हती, मात्र आत्महत्या झाल्यावर रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात मृत युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं पुढे आल्याने प्रकरण गंभीर वळणावर आले.
आई-वडिलांनी यासंबंधात संशयित आरोपी असलेल्या मुलाकडे चौकशी केली, मात्र त्याने असं काहीही झाले नसल्याचे म्हणत हात वर केले. या प्रकाराने धक्का बसून पीडित मुलीने २९ ऑगस्टला रात्री गळफास लावून आत्महत्या केली. मात्र याबाबतची तक्रार शुक्रवारी पोलिसात दाखल झाली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here