पुणे : प्रतिनिधी
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे.
मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व ७ आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व १० , धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अश्या एकूण २३ जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान २३ ते २४ नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तसेच शनिवार ते सोमवार, २५, २६, २७ नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार २६ नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमे) ला पावसाचे वातावरण अधिक गडद होणार आहे. खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, या जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते.