जळगाव : प्रतिनिधी
गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे भाव पुन्हा वधारू लागले असून मंगळवार, 21 नोव्हेंबर रोजी भावात 300 रुपयांची वाढ होऊन सोने 61 हजार 800 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तसेच चांदीच्या भावात सोमवारी 300 रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम असल्याने चांदी 74 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 250 रुपयांची घसरण होऊन ते 60 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 200 रुपयांची घसरण झाली होती. मात्र 16 नोव्हेंबारपासून सोन्याचे भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली व ते 61 हजार रुपयांवर पोहचले. दुसऱ्या दिवशी 17 रोजी पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली व सोने 61 हजार 500 रुपयांवर पोहचले. तीन दिवस हे भाव स्थिर राहिल्यानंतर मंगळवार, 21 रोजी त्यात 300 रुपयांची वाढ झाल्याने सोने 61 हजार 800 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
अशाच प्रकारे चांदीच्याही भावात दोन दिवसात 300 रुपयांची वाढ झाल्याने ती सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी 74 हजार 300 रुपये प्रति किलोवर पोहचली. मंगळवारी याच भावावर ती स्थिर राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर गंतवणूक वाढू लागल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.