मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी कालपासून पुन्हा सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीस वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आता मॅरेथॉन सुनावणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक समोर आले आहे.
विधानसभेत काल आमदार अपात्रता सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. मंगळवारी दिवसभरातील सुनावणी संपली असून बुधवार, 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. आजच्या कामकाजात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. शिंदे गटाचे वकील ॲड. महेश जेठमलानी यांनी दिवसभराच्या सुनावणीत ठाकरे गटाचे विधीमंडळ व्हीप सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. जेठमलानी यांनी प्रभूंना अडचणीचे प्रश्न विचारले. मात्र, प्रभू यांनी संयमी उत्तरे दिली.
31 डिसेंबरपर्यंतची मुदत देत एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन पाळली नाही तर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत
आहे.
आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक कसे आहे?
शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. बुधवार 22 ते 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. रविवारी 3 डिसेंबर रोजीदेखील सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूकडील आमदारांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहे. त्याशिवाय, व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा लागणार
शिवसेनेच्या आमदारांनी दाखल केलेल्या 34 याचिकांचे सहा गट करून ही सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधीमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात आले.