अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

0
13

पुणे : प्रतिनिधी

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी आतापर्यंत एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
ललित पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून ससूनमधील वॉर्ड क्रमांकमध्ये बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी काळे आणि जाधव यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने दोघांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. काळे आणि जाधव यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली, तसेच गंभीर स्वरुपाची शिस्तभंग आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवून दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here