जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार आणि शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणाऱ्या तेजस रवींद्र मोरे (३४) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पूत्र व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात या पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तेजस मोरे हे साक्षीदार असून त्यात त्यांचा जबाबदेखील झाला आहे. ही बाब ॲड. चव्हाण यांना माहित झाल्यानंतर मोरे यांनी साक्ष देऊ नये, यासाठी त्यांना तीन जणांमार्फत समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मोरे त्यास तयार झाले नाही. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी मोरे मुंबई ते पुणे प्रवास करीत असताना त्यांचे वाहन अडवून तुला जीवंत सोडणार नाही म्हणजे साक्ष फिरवण्याचा प्रश्नच राहणार नाही, अशी तिघांनी धमकी दिली. त्या वेळी एकटे असल्याने मोरे यांनी सहमती दर्शविली. दरम्यान, तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशीही धमकी दिली. तसेच १६ नोव्हेंबर रोजी मोरे हे रात्री जळगावातील घरासमोर शतपावली करीत असताना चार जण त्यांच्याजवळ आले व चार कोटी आताच दे, नाही तर तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. मोरे यांनी आरडाओरड केली असता चौघेजण पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मित्रामार्फत मोरे यांना समजले की, ॲड. चव्हाण समोर न येता त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून तीन जणांना हाताशी धरून धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्लॅन केला आहे.
ही मंडळी जिवानिशी मारुन टाकतील, असे वाटू लागल्याने मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, त्यांचा मुलगा व धमकी देणारे तीन जण अशा पाच जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करत आहेत.