दौंड : वृत्तसंस्था
आरक्षणाचा लढा ७० टक्के जिंकत आला आहे. काही झाले तरी हा लढा जिंकायचा आहे. नोंदी मिळाल्या आहेत. त्या नोंदींचा अहवाल पारित होणार आहे. तो अहवाल स्वीकारत २४ डिसेंबरला सरकार कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण जाहीर करणार आहे. त्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही, तर २५ डिसेंबरला समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा जाहीर करू. मात्र याबाबत जो काही निर्णय होईल तो शांततेत होईल. मात्र सरकारला तो निर्णय खूप जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात दौंड तालुक्यातील वरवंड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील बोलत होते. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वाढणार आहेत. मतभेद होऊ देऊ नका. सरकार आणि समाजातीलच काही लोक स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. कारण सरकारकडे पर्याय राहिला नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील म्हणाले की, आपल्या समाजातील कार्यकर्त्यांना पुढे घालून मराठा आरक्षणाला विरोध करायला लावायचा. हा एकमेव पर्याय सरकारकडे उरला आहे. त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आरक्षण नको म्हणायला लावायचे, अशी भूमिका मांडायला लावू शकतात. त्यामुळे त्यांच्या हातापाया पडून सांगा की, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. हातातोंडाला आलेल्या आरक्षणाच्या घासात विष कालवण्याचे काम करू नका, असा इशारा ही जरांगे यांनी दिला. विजयाचा क्षण जवळ आला आहे. आपल्यात मतभेद होऊ देऊ नका. कोणता नेता जर मतभेद करत असेल तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्याला कधीच माफ करायचे नाही, असेही जरांगे म्हणाले.
जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, जरांगे पाटील बोलत असताना माइकमधून डबल आवाज येत असताना तो बंद करा असे म्हणत, तिकडे आरक्षणाचं ही असेच झालं. आमचं आरक्षण इथं आणि आम्हाला हिंडायला लावले ५० टक्केच्या वर त्यातच पन्नास पिढ्या गेल्या. घेणं नाही देणं नाही. घे ५० टक्केच्या वर तू घे ना, आम्हाला कशाला देतो. तू खातो आतलं. आमचं खातो, तुझं खातो. तू ओबीसीचं खातो ओपनमध्ये येतो. ईडब्ल्यूएसमध्ये येतो. खातो तरी किती. तुला साऱ्या दुनियाचं पुरेना. तरीही म्हणतो आमच्यात येऊ नको, असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मात्र या दौऱ्यात ते नियोजित वेळी पोहोचू शकत नाहीत. गावागावातील मराठा बांधव यांच्या स्वागतासाठी उभे असल्याने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर होतो. याबाबत त्यांनी दिलगीर व्यक्त केली. ते म्हणाले की, सकाळी ११ ची वेळ ठरली होती. गावागावातील लोकांनी गाडी अडवल्याने मला तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. तुम्हाला खूप वेळ उन्हात बसायला लावलं. पण माझी सध्याची परिस्थिती अशी झाली की दिलेल्या वेळेवर मी पोहोचू शकत नाही, कारण लोक रस्त्यावर अडवायला लागले.
पहाटे चार वाजता मनोज जरांगेंची सभा
करमाळा, सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे सध्या सकल मराठा समाजाचे एकमेव हिरो ठरले असून करमाळा तालुक्यातील वांगी येथे चक्क पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या उपस्थितीत त्यांची विराट सभा झाली. उजनी बॅकवॉटरवर असणाऱ्या वांगी येथील सभा सायंकाळी सात वाजता होणार होती मात्र समाजातून मिळणाऱ्या अलोट प्रेमामुळे जरांगे यांना करमाळ्यात पोहोचायला तब्बल पहाटेचे चार वाजले.कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलेही जरांगे यांना ऐकण्यासाठी वाट पाहत थांबले होते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून त्याची उब घेत थांबलेल्या या हजारोंच्या गर्दीने जरांगे येताच एकच जल्लोष करीत त्यांचे जंगी स्वागत केले. इतक्या पहाटेपर्यंत थांबलेल्या हा समाज पाहून जरांगे देखील भावुक झाले आणि आरक्षण मिळाल्यावर तुमचे ऋण समाज कधीही विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या समाजाचे आभार मानले.