कारागृहातील मुलाला भेटण्यासाठी आईकडून लाच मागणाऱ्या महिला पोलिसाला पकडले

0
26

जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा कारागृहात असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेणारे सुभेदार भिमा उखर्डू भिल, महिला पोलिस पूजा सोपान सोनवणे आणि हेमलता गयबू पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली.
तक्रारदार महिला पहूर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिला यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत भेटू न देण्याचे सांगितले जात होते. अशाच प्रकारे मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, महिला पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांच्यासह इतर जण होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदार महिलेची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैसे देवू शकत नव्हती. त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला कारागृह पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा उखर्डू बिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच मागितली. त्याच वेळी धुळे पथकाने हेमलता पाटील यांना रंगेहात पकडले. ही कारवाई धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे यांनी
केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here