कर्जाच्या ताणाने सहकारी साखर कारखाने रसातळाला जातील

0
20

कोल्हापूर : वृत्तसंस्था
ऊस दरासाठी उपोषणाच्या राजु शेट्टींच्या भूमिकेवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका करीत व्यवहारी विचार केला तर यामुळे कर्जाच्या ताणाने सहकारी साखर कारखाने रसातळाला जातील , अशी भूमिका घेतली आहे.
ऊस दरासाठी आक्रोश पदयात्रा झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऐन दिवाळीत उपोषण करणार आहेत. जयसिंगपूर येथे मंगळवारी झालेल्या २२ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. चालू हंगामात ऊसाला एकरकमी ३,५०० उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही, असा निर्धारही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.
राजू शेट्टी यांच्या वक्तव्यावर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी आम्ही राजू शेट्टी यांना सांगितलं होतं की, कोल्हापुरातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे. चार महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढले आहेत. कारखाने एफआरपी कायदा पाळत असतील, विनाकपात एकरकमी पैसे देत असतील, प्रॉफिट शेअरिंगचा कायदा पाळत असतील तर दरवेळी साखरेचे दर वाढले म्हणून असं आंदोलन करणं योग्य नाही.
हसन मुश्रीफ म्हणाले, कर्नाटकमध्ये, सांगली, सातारा आणि इतर ठिकाणी साखर कारखाने सुरू आहेत. २,८०० रुपये भावाने ऊसखरेदी सुरू आहे. परंतु, आंदोलनामुळे आमच्या जिल्ह्यातले साखर कारखाने बंद आहेत. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे. कारखान्यावरील कर्ज इतकं वाढलं आहे की, मला आता रात्रीची झोप लागत नाही. एकरकमी एफआरपी दिल्यामुळे कारखान्यांना वारंवार कर्ज काढावं लागलं आहे. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीमुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फटका या कारखान्यांना बसतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here