मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कौल सोमवारी हाती आले. त्यात अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. तसेच राज्यभरातील निकालात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. नागपूर, बारामतीसह अनेक गड महायुतीने काबीज केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १६७ पैकी १५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ३१ गावांतील रिक्त सदस्यपदाच्या ५१, तर सरपंचपदाच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींत विजय मिळविल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर सोमवार (६ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर गावकऱ्यांना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांचा कारभारी मिळाला. यामध्ये ६०० पेक्षा अधिक जागा मिळवून भाजपने अव्वल क्रमांक पटकवला आणि दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाने नंबर लावला. ३५० पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे बारातमीचा गडही अजित पवारांनी राखल्याचा दावा केला जात आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने २५० पेक्षा जास्त जागांवर त्यांचा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे १००० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा डंका वाजल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात अजित पवार गटाचा करिश्मा
पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने १०९ जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर त्यानंतर ३४ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसने २५, शिंदे गट १० , ठाकरे गट १३, शरद पवार गट २७, इतर ११ अशा एकूण २२९ जागांवर विजय मिळवला आहे. २३१ पैकी दोन जागा रिक्त आहे. एक मुळशीमध्ये तर एक भोरमधील जागेचा समावेश आहे. दरम्यान, बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. काटेवाडीत १६ पैकी १४ जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर भाजपने पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव केला आहे. भाजपने काटेवाडीत २ जागा जिंकल्या आहे.
लोकांचा कल महायुतीकडे : मुख्यमंत्री
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटले आहे की, महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मतदारांनी त्यांचा कौल महायुतीला दिला आहे. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानतो. मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामे महायुतीच्या सरकारने पूर्ण केली आहेत. या प्रकल्पांना चालना देऊन आम्ही राज्याच्या सर्वांगिण विकासाचे काम केले. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहचले आहे. हे सगळं मतदारांनी त्यांच्या कृतीमधून हे दाखवून दिले आहे,असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.