बारामती : वृत्तसंस्था
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी आज मतदान होत आहे. आज (५ नोव्हेंबर) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
माझे वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यादेखत (हयातीत) माझ्या मुलाने (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावे. बारामती आपलीच आहे, लोकांचेही दादांवर प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या आईनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी कांँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.“माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या आईच्या इच्छेबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थातच कुठल्या आईला तसे वाटणार नाही.” सुप्रिया सुळेंंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.