हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न : राहुल नार्वेकर

0
17

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आदेशांची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेवेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सुनावणीमध्ये चालढकल केली जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला बळ मिळाले असून त्यावरून राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडले होते. “राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी”, असे उद्धव ठाकरे मंगळवारी म्हणाले होते.

राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर
आपल्यावरील आरोप हे दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचे राहुल नार्वेेकर म्हणाले आहेत. “ज्यावेळी मला या आदेशासंदर्भात विचारले गेले, तेव्हा माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती.ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल तर त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा.आता उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल”, असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.
“विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेणे हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी करावा”, अशा शब्दांत राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर ती वेबसाईटवर अपलोड झाली. त्यानंतर ती मला मिळाली. त्यावरून अशा कमेंट्स केल्या जात आहेत. त्यांना जर आदेशाची प्रत इतरांपेक्षा आधी मिळाली असेल, तर त्यांनी तो खुलासा करावा. हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे”, असे नार्वेकर म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here