रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर ५ धावांनी विजय

0
29

धरमशाला : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथल्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या रोमांचक लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने रचीन रवींद्रचे शतक आणि जेम्स नीशामचे अर्धशतक यांच्या वादळी खेळीच्या बळावर विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर नीशाम बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजय खेचून आणला.या सामन्यात ६५ चौकार आणि ३२ षटकारांचा वर्षाव झाला.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग जोडीने ६१ धावांची सलामी दिली. जोश हेझलवूडने कॉनवेची खेळी संपुष्टात आणली. पाठोपाठ विल यंगलाही त्यानेच तंबूत धाडले.यानंतर डॅरेल मिचेल आणि रचीन रवींद्र जोडीने ८६ चेंडूत ९६ धावांची वेगवान भागीदारी केली.झंपाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा मिचेलचा प्रयत्न मिचेल स्टार्कच्या हातात जाऊन विसावला.

रचीन रविंद्र- निशमची झुंज
कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलीप्स झटपट बाद झाले पण रचीन रवींद्रने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याच्या शतकामुळेच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित राहिल्या. रवींद्रने ७७ चेंडूत शतक पूर्ण केले. वर्ल्डकप स्पर्धेतले त्याचे हे दुसरं शतक आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने रवींद्रला बाद केले.त्याने ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली.रवींद्र बाद झाल्यानंतर नीशामने सूत्रे हाती घेतली. सँटनरने १२ चेंडूत १७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. नीशामने ३९ चेंडूत ५८ धावा करत न्यूझीलंडला जिंकून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शतकांच्या बळावर ३८८ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाक्षणी २४ षटकात २०० अशा सुस्थितीत होता मात्र त्यानंतर त्यांची धावगती मंदावली आणि विकेट्सही गमावल्या. चार चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव ३८८ धावांवर आटोपला.

वर्ल्डकप पदार्पणात हेडचे शतक
वॉर्नर-हेड जोडीने चौकार, षटकारांची लयलूट करत १७५ धावांची सलामी दिली. ग्लेन फिलीप्सने वॉर्नरला ८१ धावांवर बाद केले. त्याने ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६५ चेंडूत ८१ धावा केल्या. दुसरीकडे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हेडने किवी गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ५९ चेंडूत शतक पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here