जळगाव : प्रतिनिधी
एल.के.फाऊंडेशनतर्फे शहरातील मेहरुण चौपाटीवर काल सायंकाळी विजया दशमीनिमित्त ५१ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. ‘बोलो सियावर रामचंद्र की जय…’असा जयजयकार यावेळी करण्यात आला. रावणदहन पाहण्यासाठी जळगावकरांची अलोट गर्दी झाली होती.
याप्रसंगी मेहरुण तलाव चौथाऱ्यावर रावणदहनाप्रसंगी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,एल.के.फाऊंडेशनचे ललित कोल्हे आदींची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीरामाच्या प्रतिमेला मार्ल्यापण करीत तसेच दिपप्रज्वलन करीत रावणदहन सोहळ्याला सुरुवात झाली. यंदा मेहरुण तलावावर दसऱ्यानिमित्त गुरुवारी ५१ फुट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.याप्रसंगी रावण दहनपूर्वी आतषबाजी करण्यात आली.
शुभेच्छांचा वर्षाव….
विजयादशमीनिमित्त काल सायंकाळी आपट्याची पाने थोरामोठ्यांना, लहानग्यांना देत विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. लहानग्यांना आशिर्वाद देत साखर, चॉकलेट्सचे वाटप घरोघरी करण्यात आले. सोशल मिडीयावर देखील विविध चित्रांनी, ओळींनी शुभेच्छांचे वर्षाव सुरु होते.