पुणे : प्रतिनिधी
युवा संंघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे.तरूणांना नवा विश्वास,आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे.कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला.सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे दिला.
युवकांच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ आज (मंगळवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला.यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली.त्यावेळी ते बोलत होते.
युवा संघर्ष यात्रेचे आयोजक, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण,शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे, अशी तरूणांची अपेक्षा आहे.त्याची सुरूवात संघर्ष यात्रेतून झाली आहे.या यात्रेच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन शक्य आहे,असे पवार यांनी सांगितले.ते म्हणाले की, आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे.हा प्रवास सुमारे पंचेचाळीस दिवसांचा आहे.ही यात्रा तरूणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेचा प्रांरभही उत्तम झाला आहे. युवा वर्गाचा कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला.हे या यात्रेचे यश आहे त्यामुळे या यात्रेकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही.विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे.या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
यात्रेला जोरदार सुरूवात
युवा वर्गाच्या समसया मांडण्यासाठी आयोजित युवा संघर्ष यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. ही यात्रा तेरा जिल्ह्यांतून आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे. नागपूर येथे यात्रेचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी प्रकरण, नागरी सेवा परीक्षासंदर्भातील निर्णय, बेरोजगारी आदी मागण्या यात्रेच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. युवकांना संघटीत करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहीत पवार उतरले मैदानात
राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारला घाम फोडण्यासाठी राष्ट्रवादी युवा नेते रोहीत पवार हे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथून काल युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली. ही यात्रा राज्यातील १८ जिल्ह्यांमधून फिरून युवकांमध्ये जनजागृती करणार आहे.