बुलढाणा : प्रतिनिधी
लडाखच्या सियाचीन येथे तैनात असलेले भारतीय लष्कराचे अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले आहे.अक्षय गवते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात दाखल झाले होते.त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा दावा करत विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत भारतीय सैन्याने माहिती दिली आहे.
भारतीय लष्कराने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, अक्षय गवते यांच्या कुटुबीयांना १ कोटी १३ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी, आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून दिली जाणारी भरपाई, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा समावेश आहे.
शहीद अक्षय गवतेंच्या अग्निवीर म्हणून राष्ट्रसेवेच्या ४ वर्षांपैकी जितका कार्यकाळ शिल्लक होता तोवर त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतील. ही रक्कम १३ लाख रुपये इतकी असेल.सशस्त्र दल युद्ध कोषातून (आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड) ८ लाखांचा निधी दिला जाणार आहे.तात्काळ स्वरुपाची ३० हजारांंची आर्थिक मदत,अशी एकूण १ कोटी १३ लाख रुपयांची मदत दिली जाईल.