चंद्रपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.सर्वेोच्च न्यायालयाने १२ मे रोजी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय देण्याचे निर्देश दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप त्यावर निर्णय न घेतल्यामुळे गेल्या आठवड्याभरात दोन वेळा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलंच फैलावर घेतले आहे. आता अखेरची संधी म्हणून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीसाठी ३० ऑक्टोबरची तारीख दिली असून लवकरात लवकर निर्णय होईल असे सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देेश न्यायालयाने दिले आहेत.आता त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर
काय भूमिका घेणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शेवटची संधी म्हणून दिलेला अल्टिमेटम चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे चालू असताना विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.यादरम्यान राहुल नार्वेकर चंद्रपूरमध्ये देवदर्शनासाठी गेले असता तिथे माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात विचारणा केली.
“आज आम्ही देवीचे दर्शन घ्यायला चंद्रपूरला आलो आहोत. महाराष्ट्राला न्याय देण्याची बुद्धी मला प्राप्त होवो, अशी प्रार्थना मी देवीचरणी केली आहे”, असे राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात निकाल कधी लागणार? असा प्रश्न विचारला असता “हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.
