दसऱ्याला पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे, शिंदेंच्या आधी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार

0
35

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे. राज्यात दसऱ्याच्या दिवशी अनेक राजकीय सभा होतात. त्यामुळे राज्यातील राजकारण ऐन हिवाळ्याच्या तोंडावर दरवर्षी कमालीचे तापते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक हे संबोधित करतात. त्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो. तर रात्री मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. या सभांनी राज्यातील राजकारण ढवळून निघते. आता यंदा दसऱ्याच्या सभेत आणखी भर पडणार आहे. यावर्षी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात सभा पार पडणार आहे.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी १० वाजता ही सभा होणार आहे. २४ तारखेला दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घोषित केलेल्या युवा संघर्ष यात्रेची सुरवात पुण्यातून होत आहे. या यात्रेला शरद पवार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानिमित्ताने ही जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या याआधी दोन सभा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर आता या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. त्यातही राष्ट्रवादीतील मोठा गट घेऊन बाहेर पडलेले अजित पवार हे नुकतेच पुणे शहराचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या या सभेकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता दसऱ्याच्या दिवशी आरएसएस सह ठाकरे, शिंदे आणि मुंडेच्या भाषणाने राज्याच्या राजकारणात नवं वळणं लागते का? पवारांच्या पॉवरमुळे आणखी काही वेगळी समीकरणे तयार होतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.

ठाकरेंचा शिवतीर्थावर तर
शिंदेंचा आझाद मैदानात मेळावा
यंदा ठाकरे गटाचा शिवतीर्थवरील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जागेचा शोधाशोध सुरू होता. अखेर शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.
शरद पवार यांनी धनगरांचा गेम केला: गोपीचंद पडळकर
कोल्हापूर : धनगर आरक्षणाच्या बाजूने १७० पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल लागेल. मात्र, न्यायालयीन लढाईत जर काही अडचण आल्यास धनगर समाजाला रस्त्यावरील लढाई करण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याच कोल्हापुरात पट्टणकोडोली येथे धनगर जागर यात्रेत बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली. पवार यांनी धनगरांना एनटी प्रवर्गातून आरक्षण देत गेम केला. यापुढे घोंगडी आणि काठी हातात घेण्याऐवजी कुऱ्हाड हातात घ्यावी आणि अन्याय विरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही पडळकर यांनी केले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला असून धनगर समाजाची मागणी एसटीमधून आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवार मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेलं एनटी आरक्षण देत धनगर समाजाची दिशाभूल केली.पवारांनीच धनगरांचा गेम केला आहे. प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल अशीच शरद पवारांची नीती असून शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झालं आहे. यामुळे पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे.असे म्हणत पवारांवर टीका केली आहे. तसेच मी यात्रा सुरुवात केल्यानंतर लबाड लांडग्यांची पिल्ले बोलायला लागली. र आणि ड चा घोळ पवारांनी घातला असे म्हणत प्रस्तावित औलादिने धनगर समाजावर अन्याय केला, आमच्या मायबापाचा भोळेपणाचा भंडारा लावून फायदा घेतला, असे म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here