रोहित सेनेपुढे पाकची शरणागती

0
45

अहमदाबाद : वृत्तसंस्था

भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडाला. त्यांनतर कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज ८६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर काल भारताने क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ७ गडी राखत दणदणीत विजय साजरा केला.
दिमाखदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाने घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला वन-डे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा सलग आठवा विजय ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धचे ‘अजिंक्य’पद टीम इंडियाने अबाधित ठेवले आहे.
३४ षटकांच्या आत भारताने लक्ष्य साध्य केल्यामुळे रनरेनटमध्ये भारताची सरशी ठरली आहे. यामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत पहिल्या क्रमवारीवर झेप घेतली आहे.

पाकिस्तानला १९१ धावावर गुंडाळला
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. ३० षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद १५६ धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने ६ गडी गमावले. पाकिस्तानच्या संघ अवघ्या ४२.५ षटकांमध्येच तंबूत परतला. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अवघ्या १९१ धावांवर पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचा डाव ४३ व्या षटकांमध्येच संपुष्टात आला.

रोहित शर्माची धुवाधार फलंदाजी
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ आणि विराट कोहली आउट झाल्यानंतरही रोहितने आपली दमदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाचा विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने ६३ चेंडूत ८६ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार तर ६ षटकार फटकावले.

रोहित षटकारांचा बादशहा, वनडे क्रिकेटमधील षटकार @ ३००
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर ३५१ षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर ३३१ षटकार आहेत. वन-डे विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक षटकार हे रोहित शर्माच्या नावार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here