मुंबई : प्रतिनिधी
येथील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे दसरा मेळावा घेण्याकरता शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. गेल्यावर्षी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे मुंबईत तणाव वाढला होता. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही असाच तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई पालिकेत केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदा सरवणकर म्हणाले, दसरा हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंच्या सणात कुठलाही वाद न होता, आनंदात साजरा व्हावा, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. शिवसेनेच्या वतीनं होणार दसरा मेळावा आझाद किंवा क्रांती मैदानात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तशाप्रकारचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार शिवाजी पार्क मैदानात ५० वर्षे ऐकता आले. हेच विचार आता आझाद किंवा क्रांती मैदानातून ऐकायला मिळतील, अशी आमची इच्छा आहे, असे सरवणकरांनी सांगितले.
मैदानासाठी न्यायालयात गेले असते, ठाकरे गटाला सहानभुती मिळाली असती, या प्रश्नावर सदा सरवणकर म्हणाले, “सहानभुतीसाठी मेळावा रद्द केला नाही. आम्हाला कुठलाही वाद करायचा नाही. काम करून संघटना मोठी करायची आहे. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची, हे एकनाथ शिंदेंचं धोरण आहे.
१आणि ७ सप्टेंबरला शिवाजी पार्क मैदानासाठी मी पत्र दिलं होतं. परवानगी मिळणार नाही, म्हणून अर्ज मागे घेतला, असे नाही. एकनाथ शिंदेंचं धोरण अतिशय समजूतदारपणाचं आहे. सणांमध्ये वाद होऊ नये, अशी भावना एकनाथ शिंदेंची आहे. नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला, असे सदा सरवणकरांनी सांगितले.
