एखादा निर्णय घटनाबाह्य असेल तर सर्वोच्च हस्तक्षेप करू शकते

0
33

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल,याची खात्री आहे. संस्थेला काम करण्याची मुभा दिली पाहिजे, असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमदार अपात्रतेप्रकरणी १३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबद्दल विचारल्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “याचिका दाखल केल्याने सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की, संविधान शिस्त पाळली पाहिजे. संविधानाप्रमाणे विधिमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंंडळ समान आहे. तिन्ही आपल्या कार्यक्षेत्रात काम करतात.”
“सर्वोच्च न्यायालय आपल्यासमोरील याचिकांवर निर्णय घेईल.एखादा निर्णय घटनाबाह्य असेल, तर सर्वोच्च हस्तक्षेप करू शकते पण तसं काही नसेल, तर सर्वोच्च न्यायालय अन्य कामकाजात हस्तक्षेप करणार नाही. हीच संवैधानिक शिस्त आहे,” असे राहुल नार्वेकरांनी म्हटले.
अपात्रतेप्रकरणी वेगळीवेगळी विधान केली जातात. कुठेतरी दबाव आहे का? याप्रश्नावर राहुल नार्वेकरांनी म्हटले, “सभागृहाच्या बाहेर केलेल्या आरोपांंवर मी लक्ष देत नाही, हे आधीही सांगितले आहे. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी आरोप होत असेल तर मी प्रभावित होणार नाही. माझ्या निर्णय प्रक्रियेत कुठलाही फरक पडणार नाही. ज्यांना संविधानाचे ज्ञान नाही, असे लोक आरोप करतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here