नाशिक : प्रतिनिधी
शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कांदे , टॉमॅटो फेकण्यात आल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. संबंधितांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे पक्षीय दृष्टीने प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दादांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी सकाळी विमानाने ते ओझर विमानतळावर उतरल्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. सत्तेत सहभागी होताना साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत.त्यासाठी ते मार्गस्थ होत असताना वणी परिसरातील बिरसा मुंडा चौकात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
त्याची माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली. काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे.६० ते ७० रुपये जाळी (२० किलो क्रेट) दराने शेतकऱ्यांंना टोमॅटो विकावे लागत आहेत. दुसरीकडे कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावून दर पाडण्यात आले. सरकारच्या शेतकरी विरोधी कार्यशैलीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान,या प्रकाराने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. एक ते दीड महिन्यांपासून स्थानिक पातळीवर कांद्याचा प्रश्न गाजत आहे.उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात असे काही घडू शकते, याची कल्पना यंत्रणेला कशी आली नाही, असा प्रश्न अजित पवार समर्थक विचारत आहेत.