साईमत मुंबई प्रतिनिधी
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांंची राज्याच्या पोलीस महासंंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्याच महिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले.त्यापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला.या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते.त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) याची माहिती देणारी पोस्ट केली आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!” असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तत्कालीन मंंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांंचे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आले होते.
२०१९ मध्ये मविआचे सरकार स्थापन होण्याच्या काळात रश्मी शुक्ला यांंनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांंचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात आला. या नेत्यांंचे फोन टॅप करण्याची परवानगी मागताना त्यांची नावे बदलून ही परवानगी घेण्यात आली. यात संजय राऊतांसाठी एस रहाते तर एकनाथ खडसे यांच्यासाठी खडासने अशी नावे टाकल्याचाही आरोप करण्यात आला.त्याशिवाय नाना पटोलेंंसाठी अमजद खान या ड्रगमाफियाच्या बोगस नावाचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
उच्च न्यायालयाचे निर्देश
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई व पुण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
