राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार

0
44

नागपूर : वृत्तसंस्था

देशभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरीही महाराष्ट्रात मात्र येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे, मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे.अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी आणखीच पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे.त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा भारतातील मान्सूनचा कालावधी संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here