मुंंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकारला मिळणार आहेत. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडून तीन वर्षांसाठी कर्जावर ही वाघ नखं दिली जाणार आहेत, असे सांस्कृतिक कार्य विभागाने या आठवड्यात जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयात हे मौल्यवान शस्त्रं सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली जातील,असे सरकारने म्हटले आहे.
लंंडनमधून वाघ नखं परत आणण्याबाबत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघ नखांचे प्रदर्शन आणि राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांच्या योजनांना अंतिम रूप देईल.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ नखं नोव्हेंबर महिन्यात मुंबईत आणणार असल्याचे सांगितले होते. मुनगंटीवार युनायटेड किंगडमला भेट देतील आणि ३ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा लंडनला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते परंतु शिंदे यांनी नुकताच आपला आठवडाभराचा यूके आणि जर्मनी दौरा रद्द केला.
