पवारांची साथ सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स

0
31

जळगाव : प्रतिनिधी

शरद पवारांची साथ सोडण्यासाठी मला दोन बड्या नेत्यांनी विचारले होते तसेच भाजपामधल्या लोकांनी तर थेट ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांंनी केला.राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी शरद पवार यांना घट्ट पकडून ठेवावे, भाजपात येण्यासाठी हातपाय जोडू नये असे वक्तव्य भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केले होते त्यावर विचारले असता एकनाथराव खडसेंनी हा गौप्यस्फोट केला आहे.
मला अजित पवारांचा फोन आला होता.अमोल मिटकरींमार्फत त्यांंनी बरोबर येण्यासाठी ऑफर दिली होती मात्र ती ऑफर मी नाकारली. मी शरद पवारांसह आहे आणि त्यांच्याच बरोबर राहणार आहे असे मी मिटकरींना सांगितले. मला या दोन्ही नेेत्यांनी ऑफर दिली होती पण मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे आणि त्यांची साथ सोडणार नाही, असे एकनाथराव खडसे यांनी म्हटले
आहे.

भाजपावाले रोज ऑफर देतात
अजित पवार गटात जायला किंवा भाजपात जायला मी उतावीळ आहे असे महाजन म्हणतात मात्र मी त्यांच्याकडे कधी आलो हे अजित पवारांनी जाहीर करावे. अजित पवारांनीच मला बरोबर येण्यासाठी विचारणा केली. मिटकरींनी मला फोन केला. भाजपावाले तर रोज समोरून ऑफर देतात. मी भाजपाकडे गेलो नाही तर मी अजित पवारांच्या बरोबर कसा काय जाईन? असाही प्रश्न खडसेंनी विचारला.
हाजीहाजी करणारा नेता नाही
मी सत्तेसाठी कोणाचाही हांजीहांजी करणारा नेता नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक, मीच संकट मोचक आहे असे सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचे असते तर कधीच गेलो असतो,असे म्हणत नाथाभाऊंंनी गिरीश महाजन यांच्यावर नामोल्लेख न करता टीका केली.

मात्र अजित पवार यांचा नकार
एकनाथराव खडसेंंच्या या गौप्यस्फोटाविषयी अजित पवार यांंना विचारले असता, मी कुणालाही फोन केला नाही. तसेच मी अमोल मिटकरींच्या मार्फत कशाला कुणाला फोन करेन? मी थेट बोलणारा माणूस आहे. कुणाशी बोलायचं असेल तर मी थेट बोलतो,कुणाच्याही मार्फत बोलत नाही असे अजित पवार यांनी
म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here