पाकिस्तानी संघाला भारताचा व्हिसा मिळेना; बाबर सेनेची धडधड वाढली

0
11

मुंबई : प्रतिनिधी

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.यंदा भारताकडे स्पर्धेचे यजमानपद आहे. 29 सप्टेंंबरपासून सराव सामने सुरू होणार आहेत. 2011 नंतर पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी भारताला आहे. 2011 मध्ये भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती.
विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भारतात येणाऱ्या सर्व संघांना व्हिसा मिळाला आहे पण बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर करण्यात आलेला नाही त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाने दुबईला जाऊन सराव करण्याचा प्लान रद्द केला आहे.
ईएसपीएनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुबईत सरावाला जाणार होता. तिथून पाकिस्तानी संघ हैदराबाद गाठणार होता.आधी यूएई आणि मग भारत अशी योजना पाकिस्ताननं आखली होती पण अद्याप तरी भारताकडून पाकिस्तानी संंघाला व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप तरी व्हिसा मंजूर झालेला नाही.
भारताकडे व्हिसा मिळाला नसल्याने पाकिस्तानी क्रिकेट संघ 27 सप्टेंबरला दुबईच्या दिशेने उड्डाण करेल. तिथून ते 29 सप्टेंबरला हैदराबादला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळण्यास येतील.तोपर्यंत व्हिसा मंजूर होईल अशी अपेक्षा पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनाला आहे. भारतात येणाऱ्या अन्य सर्व परदेशी संघांना व्हिसा मिळालेला आहे. व्हिसा मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा परिणाम पाकिस्तानी संघाच्या तयारीवर होऊ शकतो. गेल्या 10 वर्षांत पाकिस्तानी संघ केवळ एकदाच भारत दौऱ्यावर आला आहे. 2016 मध्ये पाकिस्तानी संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here